नवी दिल्ली – माणूस दारूच्या नशेत कधी कोणती डेरिंग करेल याचा काही नेम नसतो. नशेत असलेल्या लोकांना ते काय करत आहेत याचे भानही राहत नाही. मग या लोकांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका नशेबहाद्दरांचा कारनामा व्हायरल झाला आहे. ज्याने आपली कार थेट रेल्वेच्या रुळांवर चढवून चांगलीच पळवली.
या व्यक्तीने दारूच्या नशेत आपली गाडी रेल्वे रुळावर नेली. तो ट्रॅकवरच गाडी चालवत होता. हे दृश्य पाहून आजूबाजूच्या रेल्वेचे लोकही आश्चर्यचकित झाले. ही घटना केरळमधील कन्नूर येथील आहे. जिथे जयप्रकाशन नावाच्या व्यक्तीने 18 जुलै रोजी शहरातील रेल्वे ट्रॅकवर आपली कार चढवली आणि ट्रॅकवरच गाडी चालवण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी कारवाई करत केरळ पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता आणि दारूच्या नशेत कार चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्याची गाडी काही अंतर रुळावर धावली आणि नंतर थांबली. त्यानंतर रेल्वे गेटकीपर आणि स्थानिक लोकांनी पोलिसांना आणि जवळच्या रेल्वे स्टेशनला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी 19 जुलै रोजी या व्यक्तीला अटक केली आणि जामिनावर सोडण्यापूर्वी त्याची कार जप्त केली.
तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत जोरात आपली कार ट्रॅकवर चालवत होता. त्याचवेळी राजधानी एक्स्प्रेसची येण्याची वेळ झाली. सुदैवाने रेल्वे येण्यापूर्वीच लोकांनी तेथे पोहोचून गाडी रुळावरून हटवली, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. अशी माहिती बघ्यांनी एका हिंदी मीडियाला दिली. या व्यक्तीचा कारसह रुळावर अडकल्याचा एक व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.