पुणे- म्हाडा प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परिक्षेचे( टीईटी) पेपरही लिक केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्याच्याकडे टीईटी परिक्षा देणाऱ्यांची यादीच सापडली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीच्यावतीने सन 2017 ते 2020 या कालावधीत टीईटी परिक्षा घेण्यात आली होती. यातील नक्की कोणत्या वर्षातील परिक्षेचे पेपर त्याने फोडले याचा तपास केला जात आहे.
तपासात डॉ. प्रीतिश देशमुख याने दलालांमार्फत म्हाडाच्या परिक्षेत बसणाऱ्या काही उमेदवारांबरोबर संपर्क साधला होता. प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात प्रत्येकी दहा लाख रुपये उमेदवारांकडून डॉ. देशमुख घेणार होता. राज्यातील दहा दलाल त्याच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणात डॉ. प्रीतीश देशमुख (रा. महेंद्रा ऍथिंया, खराळवाडी, पिंपरी, पुणे) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. देशमुख याच्याकडे महाराष्ट्रातील कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेतही या संस्थेने काम केले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तो काही दलालांच्या संपर्कात होता. दलाल प्रश्नपत्रिका उमेदवारांना देणार होत ज्या उमेदवारांनी पैसे दिले आहेत, त्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला डॉ.देशमुखने दलालांमार्फत दिला होता. दलालांमार्फत आलेल्या उत्तरपत्रिकेत फेरफार करण्यात येणार होते, असे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.