पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाची शनिवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी डॉ. काळकर यांच्या नावाची घोषणा केली.
डॉ. काळकर यांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यकाळात विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. त्याच प्रमाणे अधिष्ठातामधून डॉ. पराग काळकर यांनी व्यवस्थापन परिषदेवर काम पाहिले आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीही पहिल्या पाचमध्ये डॉ. पराग काळकर यांचा समावेश होता. मात्र त्यांना आता विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा मान मिळाला आहे.
सध्या विद्यापीठासमोर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे. तेच आव्हान नव्या प्र-कुलगुरूंपुढे असणार आहे. सध्या काही महाविद्यालयात या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत उदासिनता आहे. त्याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास डॉ. काळकर यांचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.