दौंड- दौंड तालुक्यातील सर्वच रेशनिंग दुकानांमधून धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात अंत्योदय कार्डची संख्या 6 हजार 927 असून त्यावरील लाभार्थी संख्या 31 हजार 111 आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या कार्डची संख्या 44 हजार 887 असून त्यावरील लाभार्थी संख्या 2 लाख 10 हजार 316 आहे. या दोन्हीही कार्डधारकांना एप्रिल महिन्यासाठीचा धान्यसाठा आला असून त्याची वाटपासही सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत वाटपासाठी मंजूर असलेला तांदूळही रास्तभाव दुकानदारांकडे पोहोच झाला आहे. त्यानुसार त्याचेही वाटप सध्या रास्तभाव दुकानदारांकडून सुरू करण्यात आले आहे.
हे रेशनिंगवरील धान्य मिळत असताना किंवा मिळण्यासाठी कोणतीही अडचण नागरिकांना येऊ नये म्हणून मी स्वतः प्रशासनाची दोन वेळा बैठक घेतली असून सर्व रास्त दुकानदारांना हे धान्य वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देऊ नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महसूल यंत्रणेला सूचना करून हे धान्य व्यवस्थित वितरित होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यातून कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 7038667799 या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा, असे आवाहनही आमदार ऍड. राहुल कुल यांनी केले आहे.