आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव बुद्रुक मधील दत्तनगर-आंबेगाव रस्ता हा प्रचंड वाहतुकीचा असताना गेली सहा महिने या रस्त्यावरील ड्रेनेन चेंबरवरील झाकणे तुटत असून ती दुरूस्तीकरण्या ऐवजी प्रशासनाकडून अशा ठिकाणी बॅरिकेड्स उभारले जात आहेत.
या रस्त्यावरील अनेक ठिकाणची चेंबरवरील झाकणे फुटल्याने तसेच काही चेंबरच खचल्याने तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी अशा चेंबरची दुरूस्ती केल्यानंतरही बॅरिकेड्स आडवी लावली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिका प्रशासनाच्या अशा चालढकल कामामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक हैराण आहेत. या रस्त्यावरील दत्तनगर चौक ते विठ्ठल हेरिटेज सोसायटीपर्यंत 8 ते 10 ठिकाणी ड्रेनेज चेंबरवरील झाकणे तुटली असून काही ठिकाणी दुरूस्ती करून ती नव्याने बसविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. परंतु, विजय सुपर मार्केट समोर व एचडीएफसी बॅंकेसमोर निकृष्ट दर्जाची सिमेंट झाकण बसविली गेल्याने ती पुन्हा तुटली आहेत. यामुळे अपघातचा धोका असून पालिकेच्या संबंधित विभागाने या ठिकाणच्या चेंबरची कायमस्वरूपी दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मागील सहा महिन्यांपासून रस्त्यावर सतत बॅरिकेट्स लावले जात असल्यामुळे अशा ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून पालिका प्रशासनाने अशा ठिकाणी लवकरात लवकर लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी आंबेगावचे माजी सरपंच संतोष ताठे यांनी केली आहे.
दत्तनगर-आंबेगाव रस्त्या दरम्याने अनेक ठिकाणी छोट्या व्यासाची ड्रेनेजलाइन असल्यामुळे त्यावरील चेंबरही तशा आकाराचे असल्याने ते वारंवार फुटतात. प्रकल्प विभागाकडून मोठ्या व्यासाची लाइन टाकणे आवश्यक आहे. सर्वत्र लोखंडी जाळ्यांचे चेंबर तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– संतोष गायकवाड,शाखा अभियंता, ड्रेनेज विभाग