मुंबई – पेटीएम या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या आयपीओची शेअर बाजारावर नोंदणी झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या किमती तब्बल 27 टक्क्यांनी कमी झाल्या.
आयपीओ मधील शेअरची किंमत 2,150 रुपये असताना नोंदणीवेळी शेअरची किंमत 1,955 रुपये झाली. नंतरही शेअरचा भाव घसरत गेला. स्वास्तिक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, भारतातील आतापर्यंतच्या या सर्वात मोठ्या आयपीओने बऱ्याच लोकांचा अपेक्षाभंग केला आहे.
सध्या या कंपनीचे बाजार मूल्य साधारणपणे एक लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या उपलब्ध शेअरच्या फक्त 1.89 पटीने मागणी आली होती. कंपनीने शेअरची किंमत जास्त ठेवल्यामुळे असे घडले असावे असे काही विश्लेषकांनी सांगितले.
सफायर फुड्सची धमाकेदार नोंदणी
पेटीएम कंपनीची नोंदणी निराशाजनक झाली असली तरी सफायर फूडस् या कंपनीच्या आयपीओची शेअर बाजारावर नोंदणी झाली त्यावेळेस शेअरचा भाव 4 टक्क्यांनी वाढला. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. उपलब्ध शेअरच्या 6 पट मागणी आली होती. ही कंपनी भारत, श्रीलंका, मालदीव या देशात केएफसी आणि पिझ्झा हट चालविते.