- 1470 नागरिकांची तपासणी
- 101 बाधित
चऱ्होली – दिघी येथील करोना रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी गावकऱ्यांकडून दिघी करोनामुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान सर्व नागरिकांनी कडक लॉकडाऊनचे यशस्वी पालन केले. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.
समितीतर्फे दिघी गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1470 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 101 नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसाला या मोहिमेअंतर्गत 100 नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये साधारण दिवसाला पाच नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. यापैकी बहुतांश नागरिकांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. अशा व्यक्ती या करोना वाहकाचे काम करत आहेत. वेळीच त्यांची तपासणी झाल्याने त्यांच्यामुळे करोनाचा संसर्ग होण्यास आळा बसला आहे. अशा सुपरस्प्रेडरला रोखण्यास गावकऱ्यांना व पालिका प्रशासनाला यश आले आहे. याकरिता दत्तनगर येथे माजी सैनिक भवनमध्ये उभारलेली रॅपिड अँटिजेन टेस्ट केंद्र करोना सुपरस्प्रेडरला रोखण्यासाठी यशस्वी ठरत आहे.
अँटिजन तपासणीमुळे दिघी प्रभागातील करोना रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी जास्त लक्षणे असणारे रुग्ण कमी झाले आहेत. यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी निश्चित मदत होणार आहे.