नगर – नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे पात्र आणि पूररेषा निश्चित करण्याचे काम कुकडी पाटबंधारे विभागाने प्रथमच सुरू केले आहे. महापालिकेकडे दोन वर्षांपूर्वी नकाशे सादर केले होते. त्या नकाशाची प्रत्यक्ष विकास आराखड्यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. जलसंपदा अधिकाऱ्यांच्या मदतीने महापालिकेने नकाशानुसार प्रत्यक्ष मोजणी करून सीना नदी हद्द निश्चितीचे काम सुरू केले आहे. पात्र निश्चितीमुळे या पूररेषेत सुमारे 30 ते 35 हजार बांधकामे व मोकळ्या जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नगर शहरात सीना नदीचे 14 किलोमीटरचे पात्र आहे. मात्र, या नदी पात्राची हद्द, पूररेषा याबाबत अनेक वर्षांपासून संभ्रम होता. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार असताना त्यांनी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत पात्र हद्द व पूररेषा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. कुकडी पाटबंधारे विभागाने खासगी एजन्सीची नियुक्ती करून, त्यांच्यामार्फत सर्वेक्षण करून शहरातील 14 किलोमीटरच्या नदी पात्र हद्द व पूररेषा निश्चित करून 2021 मध्येच नकाशे महापालिकेला सादर केले होते.
आता दोन वर्षानंतर नदी पात्र हद्द व पूररेषेची विकास आराखड्यावर अंमलबजावणी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे या पात्राची पाहणी व हद्द निश्चित करून तेथे खांब रोवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागापूर येथील पुलापासून हे काम सुरू करण्यात आले आहे. या पुररेषेत मोकळ्या जागा व बांधकामे अशा सुमारे 30 ते 35 मालमत्ता बाधित होणार आहेत.