नवी दिल्ली – यंदाही सलग चौथ्या वर्षी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. एका नवीन अहवालानुसार सर्वात खराब हवेची गुणवत्ता असलेल्या 50 शहरांपैकी 35 शहरे भारतातील आहेत. सन 2021 मध्ये करण्यात आलेल्या पाहणीनुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार 2021 मध्ये, भारतातील एकाही शहराने जागतिक आरोग्य संघटनेने 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर हवेच्या गुणवत्ता मानकांची पूर्तता केली नाही. आयक्यू केअर संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. 117 देशांतील 6475 शहरांमधील हवेची गुणवत्ता तपासून ही माहिती सादर करण्यात आली आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की सर्वात प्रदूषित राजधानी शहरांमध्ये बांगलादेशची राजधानी ढाका दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर चाडमधील एनजामेना, ताजिकिस्तानमधील दुशान्बे आणि ओमानमधील मस्कत या शहरांचा नंबर लागतो.
जगातल्या सर्वात प्रदूषित 50 शहरांपैकी 35 शहरे भारतातील आहेत. भारतातील 48 टक्के शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार किमान गुणवत्तेची पातळी ओलांडणारी आहेत. म्हणजेच तीही धोकादायक पातळीवर प्रदूषित आहेत. या डेटावर टिप्पणी करताना, ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी म्हटले आहे की हा अहवाल सरकारसाठी एक वेक अप कॉल आहे.