नवी दिल्ली :- दिल्ली ही देशाची इलेक्ट्रीक वाहनांची राजधानी बनली असून राष्ट्रीय राजधानीत सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जात आहेत, आणि दिल्लीत देशातील सर्वाधिक चार्जिंग स्टेशन्स आहेत असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत 42 नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी केजरीवाल बोलत होते. विविध उपाययोजनांमुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी 2014 पासून कमी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ते म्हणाले की, आम्ही प्रदुषणाला आळा घालण्यासाठी वीजेच्या वाहनाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. आम्ही 2020 मध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठी एक धोरण तयार केले आणि 2025 पर्यंत दिल्लीत खरेदी केलेल्या सर्व वाहनांपैकी एक चतुर्थांश वाहने इलेक्ट्रिक असतील, असे ते म्हणाले.
दिल्ली सरकारचे इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण ऑगस्ट 2020 जाहीर करण्यात आले. त्यात दिल्ली शहराला देशाची इलेक्ट्रीक व्हेईकल राजधानी म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने उपाय योजण्यात आले आहेत. आज दिल्लीत खरेदी केलेल्या सर्व वाहनांपैकी 13 टक्के वाहने इलेक्ट्रिक आहेत. ऑगस्ट 2020 पासून, दिल्लीत 1.28 लाख इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात आली आहेत, अशी माहितीहीं त्यांनी दिली.
केजरीवाल म्हणाले की, निती आयोगानेही दिल्लीच्या ईव्ही धोरणाचे कौतुक केले आहे. दिल्ली चार्जिंग स्टेशनला सर्वात स्वस्त वीज देते, असा दावाही केजरीवाल यांनी केला. देशभरातील चार्जिंग स्टेशनपैकी एक तृतीयांश स्टेशन्स दिल्लीत आहेत, असे ते म्हणाले.