Deepika Padukone: न्यू यॉर्कमध्ये ‘धुरंधर’च्या यशाचा जल्लोष, दीपिकाने पहिल्यांदाच बनवले मोदक

Deepika Padukone : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या न्यू यॉर्कमध्ये सुट्टी घालवत आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासोबतच त्यांनी रणवीरच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या विक्रमी यशाचा आनंदही न्यू यॉर्कमध्ये साजरा केला. याच सेलिब्रेशनदरम्यान दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने मोदक बनवले.
न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध ‘बंगलो’ या रेस्टॉरंटमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी शेफ विकास खन्ना यांची भेट घेतली. हे रेस्टॉरंट विकास खन्ना यांचंच आहे. याच ठिकाणी दीपिकाने विकास खन्नांकडून मोदक बनवण्याची पद्धत शिकली आणि पहिल्यांदाच मोदक तयार केले. या खास क्षणाचा व्हिडीओ विकास खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या वेळी विकास खन्ना यांनी रणवीरला मोदक भरवून ‘धुरंधर’च्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. दीपिकाने बनवलेले मोदक त्यांनी स्वतः चाखले आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. व्हिडीओ शेअर करताना विकास खन्ना यांनी लिहिलं की, “२०२५चा हा अत्यंत शुभ शेवट आहे. भारताच्या सन्मानार्थ एक नवी सुरुवात. रणवीर सिंह आणि दीपिकासोबत त्यांच्या पहिल्या मोदकाचा आनंद साजरा करण्याचं भाग्य बंगलो टीमला मिळालं.”
View this post on Instagram
‘धुरंधर’ची विक्रमी कमाई
रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली आहे. २६ दिवसांत देशांतर्गत ७१२ कोटींहून अधिक कमाई करत चित्रपटाने जगभरात ११०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा ठरला असून रणवीर सिंहच्या करिअरमधीलही सर्वात मोठी हिट ठरली आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोण गेल्या वर्षभरात काही मोठ्या चित्रपटांमधून बाहेर पडल्याच्या चर्चांमुळेही चर्चेत होती. मात्र न्यू यॉर्कमधील हे सेलिब्रेशन आणि मोदकाचा खास क्षण सध्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.





