नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह स्टारर “83′ हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संयुक्त अरब अमिरातीस्थित एका फायनान्स कंपनीने या चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये विब्री मीडिया आणि त्याच्या संचालकांची नावे आहेत.
अलीकडेच रणवीर सिंह आणि त्याच्यासह तगडी स्टारकास्ट असणाऱ्या “83′ या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला होता. यामध्ये रणवीरसह अभिनेत्री दीपिका पादुकोणदेखील झळकणार आहे. या चित्रपटात भारताने 1983 साली जिंकलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपची कहाणी आहे.
या चित्रपटात दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या-वहिल्या क्रिकेट वर्ल्डकपची रंजक कहाणी आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात वेस्ट
इंडिजला पराभूत करून 1983 मध्ये पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. रणवीर सिंह कपिल देवच्या भूमिकेत चपखल बसत आहे. यात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे.