Ranveer Singh : ‘त्या’ वादानंतर रणवीर सिंह पोहोचला चामुंडेश्वरी मंदिरात; हात जोडून माफी मागितली
कोर्टाने अभिनेता रणवीर सिंहला चार आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिर येथे जाऊन प्रार्थना करण्याचे निर्देश दिले होते.

Ranveer Singh | Chamundeshwari Temple : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या दोन वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आला आहे. एकीकडे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) कडून त्याच्याविरोधात Non-Cooperation Directive जारी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे ‘इफ्फी’च्या मंचावर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या धार्मिक वादानंतर त्याने कर्नाटकातील चामुंडेश्वरी मंदिराला भेट दिली आहे.
चित्रपटसृष्टीतील कामगार संघटना FWICE ने रणवीर सिंहविरोधात Non-Cooperation Directive जारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयानुसार स्पॉटबॉय, लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि संघटनेशी संबंधित इतर कामगार रणवीरसोबत काम करणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
हा वाद दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या Don 3 या चित्रपटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणवीरने अचानक प्रकल्पातून माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘इफ्फी’मधील वक्तव्यामुळे धार्मिक वाद : (Ranveer Singh)
दरम्यान, रणवीर सिंहचा आणखी एक वाद चर्चेत आहे. गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) रणवीरने ‘कांतारा चॅप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आलेल्या देवी चामुंडेश्वरी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.
त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान रणवीरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, अभिनेता बिनशर्त माफी मागेल आणि मंदिरात जाऊन प्रार्थनाही करेल.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मंदिर भेट : (Ranveer Singh)
कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहला चार आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिर येथे जाऊन प्रार्थना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रणवीरने नुकतीच मंदिराला भेट देऊन देवी चामुंडेश्वरीची विशेष पूजा केली.
या दौऱ्याबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आली होती. मुंबई विमानतळावर दिसल्यानंतर रणवीरने संपूर्ण प्रवासात चेहऱ्यावर मास्क घातल्याचेही पाहायला मिळाले. म्हैसूरमधील मंदिराच्या गर्भगृहात पोहोचल्यानंतर त्याने पूजा-अर्चा केली.
“माफी प्रामाणिक नव्हती” असा आरोप :
दि. 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रणवीरच्या वतीने माफी मागण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार असल्याचे त्याचे वकील साजन पूवैय्या यांनी सांगितले होते. मात्र तक्रारदारांच्या वकिलांनी रणवीरची माफी ही फक्त औपचारिक असल्याचा आरोप केला.
त्यांच्या मते, रणवीरने सोशल मीडियावर माफी मागितली खरी, पण ते अकाउंट त्याची टीम हाताळते. त्यामुळे त्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन देवीची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती.






