प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 30 – गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी प्रवाशांनी स्वारगेट, शिवाजी नगर आणि पुणे स्थानकांवर मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. मंगळवारी पुणे विभागातून संचलना व्यतिरिक्त 150 पेक्षा अधिक बस कोकण आणि उर्वरीत राज्यात सोडण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभातून 450 जास्तीच्या बस सोडण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक, शिवाजी नगर आणि चिंचवड एसटी स्थानकातून या बस सोडण्यात येत आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे विभागातून 230 बस सोडण्यात येणार आहेत. यातील 120 पेक्षा अधिक बसचे आरक्षण झाल्याने शनिवारपासून सोडण्यात येत आहेत.
यातील सर्वाधिक बस या सोमवार आणि मंगळवारी सोडण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसह राज्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जाण्यासाठी पुणे विभागातून 250 अधिक बस सोडण्यात आल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक येथे जाणाऱ्या भाविकांसाठीही जादा बस सोडण्यात येत आहेत तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीच्या जादा बस सोडण्यात येणार असल्याचे तशी गाड्यांची व्यवस्था केल्याचे त्या-त्या स्थानकातील प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते, त्यानुसार एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने नागरिकांचा एसटी बसला चांगला प्रतिसाद आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांबरोबरच इतर जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी देखील मागणीनुसार एसटी बस सोडण्यात येत आहेत.
– ज्ञानेश्वर रणावरे,विभागीय वाहतूक व्यवस्थापक