- महापालिकेसह प्राधिकरणाकडून कारवाईला वेग
पिंपरी – अनधिकृतपणे, पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केल्यास पालिकेकडून त्या बांधकामांवर कारवाई केली जाते. सुरुवातीला नोटीस देऊन बांधकाम काढायला सांगितले जाते. जागा मालकाने स्वत: बांधकाम काढून न घेतल्यास सदरचे बांधकाम पाडण्यासह पालिकेकडून गुन्हेही दाखल केले जात आहेत. गुरुवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध पोलीस ठाण्यात तब्बल 27 तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून एक असे एकूण 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये ठराविक उंचीचे बांधकाम करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अनेकजण परवानगीची कटकट टाळण्यासाठी विनापरवाना बांधकाम करतात. अशी बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येते. गुरुवारी गुन्हे दाखल झालेल्या संबंधितांनाही पालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने दिलेल्या वेळेत आरोपींनी त्यांचे बांधकाम काढले नाही. याबाबत पालिकेकडून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाकड पोलीस ठाण्यात 11, पिंपरी पोलीस ठाण्यात 14 तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 27 गुन्हे महापालिकेकडून दाखल करण्यात आले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून चिंचवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने मागील काही दिवसांपासून जोर धरला आहे. त्यामुळे शहरात पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.