पुणे – गोळीबार करून खूनाचा प्रयत्न केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खडकवासला धरण परिसरातून अटक केली. कुणाल रवी गायकवाड (वय. 21,रा. धायरेश्वर मंदीराजवळ धायरीगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
6 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास बिबवेवाडी येथील शिवशंकर सोसायटीमधील गल्ली क्रमांक दोन येथे अमित थोपटे याच्यावर गणेश जगदाळे व त्याच्या साथीदारांना गोळीबार केला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आर्म अॅक्टनुसार खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून कुणाल गायकवाड हा फरार झाला होता.
दरम्यान दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, पथकाला गायकवाड खडकवासला धरणाजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड कर्मचारी महेश बामगुडे, सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, अशोक माने यांच्या पथकाने कुणाल गायकवाड याला धरण परिसरातून ताब्यात घेतले.