Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता.
या व्यक्तीने मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत असून ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्याबाबत बोलत होते. त्यांचे संभाषण कानावर पडल्याने त्या व्यक्तीने तात्काळ फोन करुन ही माहिती महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला दिली.
तसेच मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्याबाबतही ते बोलत होते, असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस सतर्क झाले असून सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेकदा मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानुसार खबरदारी घेत पोलिसांनी देखील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत योग्य तपास केला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करण्याची धमकी आल्याने मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.