मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. करोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. या निर्णयामुळे त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी होत असल्याने त्यानुसार ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आमदार दत्तात्रेय भरणे म्हणाले, दोन वर्षांपासून करोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. राज्यातील वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार पदांची भरती होत असते. मात्र मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर करोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.