तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांना शहरातील सर्व प्रलंबित कामे पुर्ण करण्यात यावीत, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी पक्षाच्या शहर सरचिटणीस शोभा भेगडे, स्वप्निल भेगडे, तनुजा दाभाडे, शोभा परदेशी, गजानन राजहंस, ॠषीकेश सुतार, अमरीश कुमार, विनोद उपाध्याय, सुधाकर घनशेट्टी, अरुण भेगडे , सुनिता पाटील आदी उपस्थित होते.
शहरात अनेक ठिकाणी चेंबर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे चेंबरच्या दुरूस्तीची कामे लवकर पुर्ण करावित. रस्ते आणि भुयारी गटारी संदर्भातील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी. रविवारी भरणारा आठवडे बाजार हा नेमुन दिलेल्या ठिकाणीच भरविण्यात यावा. गाड्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. ही सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यात यावीत, असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांना देण्यात आले आहे.
मार्चअखेर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
मुख्याधिकारी एन के पाटील यांनी सर्व प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण केले जातील असे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.