पारनेर – महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारनेर-नगर मतदारसंघातील मंजूर करण्यात आलेल्या 38 कोटी 6 लाख 85 हजार रुपये खर्चाच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली असून, ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान दलित वस्ती सुधार योजनेतील 1 कोटी रुपये खर्चाच्या कामांचा मार्गही मोकळा झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली.
आ. लंके यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. शिवसेनेमध्ये फूट पडून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली होती. बजेट बुकमध्ये कामांची नोंद झाल्यानंतर कामांना स्थगिती देता येत नसतानाही त्यावेळी ही कामे रोखण्यात आली होती.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पवार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. अर्थ खात्याची जबाबदारीही पवारांकडे आल्याने पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर स्थगिती देण्यात आलेल्या सर्व कामांची स्थगिती उठविण्याचे आदेश पवार यांनी दिले. त्यामुळे ही कामे पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थगिती उठविण्यात आलेल्या कामांत रस्त्यांचा समावेश आहे.
महिन्यात 73 कोटींचा निधी
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये पारनेर-नगर मतदारसंघासाठी 29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. दलित वस्ती सुधार योजनेचे 1 कोटी, स्थगिती देण्यात आलेल्या 39 कोटी 6 लाख 85 हजार रुपयांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली तसेच पारनेर नगरपंचायतीच्या 5 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगितीही उठविण्यात आल्याने महिनाभरात एकूण 73 कोटींचा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध झाला आहे.
पर्यटनचे 10 कोटीही उपलब्ध होणार
पर्यटन खात्याकडे 10 कोटींच्या कामांची मागणी करण्यात आल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निधीलाही शिंदे-फडणवीस सरकाकडून स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगितीही उठविण्यात येणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.