सोलापूर :- सोलापुरात कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये रविवारी झालेली हाणामारी राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेचा विषय ठरली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी भाजपच्या दोन नेत्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीपर्यंत गेले. विशेष म्हणजे भाजपच्या दोन नेत्यांची भांडण कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडवली आणि हे भांडण झाले भाजप खासदारांच्या लेट कमिंगमुळे.
सोलापुरात नागपंचमी सणानिमित्त श्री चिमटेश्वर महाराजांची रथोत्सव मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या पूजेसाठी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते माजी महापौर महेश कोठे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, बीआरएसचे नागेश वल्याळ हे सर्व आले होते. परंतु खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य येणार म्हटल्यानंतर सर्वजण काही वेळ थांबले.
सुरेश पाटील यांनी बराच वेळ झाल्याने दोन वेळा खासदारांना फोन लावला. अर्धा तासाहून अधिक काळाने उशिरा खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी आले पण ते भाजपचे उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील यांना घेऊन.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पूजेनंतर फोटो काढताना बोलता बोलता सुरेश पाटील आणि राजकुमार पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. वाद वाढू नये म्हणून चेतन नरोटे, महेश कोठे, अमोल शिंदे यांनी सुरेश पाटील व राजकुमार पाटील यांना बाजूला करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
दोघांना वेगवेगळ्या गाडीमध्ये घालून पाठवून दिले. त्यामुळे वाद पुढे वाढला नाही, अशी माहिती उपस्थितांकडून मिळाली. यामुळे भाजप अंतर्गत सुरेश पाटील आणि राजकुमार पाटील यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा या प्रकारामुळे चव्हाट्यावर आला आहे.