संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली आहे. या आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिसांनी लावले नव्याने वाढीव कलम एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999) चे कलम 3 लावले आहे.
दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच रात्रीतून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य आरोपींना सहकार्य करणाऱ्या तीन तत्कालीन रोखपालांसह एका लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यानंतर पतसंस्थेच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मास्टर माईंड असलेला बॅंकेचा अध्यक्ष, राजकीय नेता भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयातील आरोपींसह पसार आहे. अद्यापही तब्बल डझनभर आरोपींचा पोलिसांना शोध लागलेला नाही. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांसह अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षक आणि व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ या पाच आरोपींची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या सर्वांना अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या न्यायालयासमोर वाढीव पोलीस कोठडी मिळण्यासाठी हजर केले होते.
दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांनी नव्याने वाढीव एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999) चे कलम 3 लावले आहे. न्यायालयासमोर सरकारी वकील एम. पी. गवते यांनी सरकार पक्षाची तर आरोपीच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश मनाठकर यांनी पाचही आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत