बीजिंग: चीन जागतिक स्पर्धेत आपले स्थान कायम मजबूत ठेवण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. त्यासाठी तो उद्योग, अवकाश यासोबत अन्य आर्थिक स्थितीचा विस्तार आणि सुधारणा करण्यास प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या चीन स्वतःचे डिजिटल चलन बाजारात आणण्याची योजना आखत आहे.
यासाठी केंद्रीय बॅंकेनी काही शहरांचे परिक्षण करण्यासाठी मान्यता दिली आहे. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार केंद्रीय बॅंक-पिपल्स बॅंक ऑफ चायनाकडून (पीबीसी) डिजिटल चलन इलेक्ट्रॉनिक पेमेन्ट(डीसीईपी) सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चीनने जगभरात केंद्रीय बॅंकांच्यासोबतच्या जागतिक स्पर्धेत वरचढ राहण्यासाठी आर्थिक पातळीवर सक्षम राहण्यासाठी कार्य करत आहेत. बॅंक शेनझेन आणि गुआंगदोंन प्रांतामधील शहरात डिजिटल चलनाची पडताळणी करण्याची तयारी करत आहेत. आगामी वर्षात हे परीक्षण वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
चीनबरोबर प्रसिद्ध सोशल मिडीया साईट फेसबुकनेही डिजिटल चलनात प्रवेश केलेला आहे. लिब्रा क्रिप्टोकरन्सी या डिजिटल चलन येत्या वर्षात वापरात आणण्याची योजना तयार केली असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. लिब्राचे व्यवहार करण्यास फेसबुक नवीन कंपनी स्थापन करणार आहे. परंतु यावर भारतात खासगी क्रिप्टो चलनास मान्यता देण्यास भारतीय रिझर्व्ह बॅंक राजी नसून आपले स्वतःचे सर्वभौम डिजिटल चलन विकसित करण्याचा विचार करत असल्याचे समजते.