संयुक्त राष्ट्र :- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्या प्रकरणी वॉन्टेड असलेल्या एका दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने खोडा घातला आहे. पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल कायदा निर्बंध कमिटीच्या 1267 नियमांतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून गोषित करावे, असा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे मांडला होता.
त्याची मालमत्ता गोठवण्यात यावी, तसेच त्याच्यावर आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घालण्यात यावी आणि शस्त्र व्यापाराचे निर्बंध घालण्यात यावे असे या प्रस्तावाचे स्वरुप होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही चीनने साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला रोखले होते, असे समजते आहे. आता चीनने या प्रस्तावाला पुन्हा रोखले आहे.
साजिद मीर हा भारतासाठीचा “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी असून 26/11 च्या हल्ल्यामधील भूमिकेसाठी त्याच्यावर अमेरिकेने 50 लाख डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे. जून महिन्यात साजिद मीर याला पाकिस्तानातील न्यायालयाने टेरर फंडींग प्रकरणी 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
साजिद मीर याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने पूर्वी म्हटले होते. मात्र पास्चात्य देशांचा त्यावर विशावास बसला नाही आणि साजिद मीरच्या मृत्यूचे पुरावे पाककडे मागितले गेले होते. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवरील कारवाईतील प्रगतीचा “एफएटीएफ’कडून गेल्यावर्षी आढावा घेतला गेला होता, तेंव्हा हा मुद्दा विशेष चर्चेत होता.
26/11 च्या हल्ल्याच्या नियोजनामध्ये साजिद मीरचा मोठा हात होता. या हल्ल्याचे नियोजन, तयारी आणि प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची जबाबदारी साजिद मीर याने पार पाडली होती, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.