अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चांगलेच चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री आमदार, खासदार आणि भाजपचे नेत्यांसोबत दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. शनिवारीच ही मंडळी अयोध्येत पोहोचले आहेत. शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहे.
आज मुख्यमंत्री शिंदे श्रीरामाचे दर्शन घेणार असून या दौऱ्यादरम्यान ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीवर महाआरती करून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता होणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसैनिकांसोबत भाजपचे नेते सुद्धा अयोध्येमध्ये गेले आहेत. गिरीश महाजन, संजय कुटे आणि राम शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत.
तर मुंबई, नाशिक आणि ठाण्याहून देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच शिंदे अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.