Chakan MIDC: चाकण एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न सुटणार! PMRDA आणि MIDC चा मोठा प्लॅन; ९ एकर जागेचा प्रस्ताव
Chakan MIDC: पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी; मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला.

Chakan MIDC- चाकण औद्योगिक परिसरातील खेड तालुक्यातील वराळे येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी चाकण औद्योगिक परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पीएमआरडीएला जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नऊ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. सध्या प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासनाने गती देण्याची गरज आहे.
चाकण एमआयडीसी परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायत, महापालिका, पीएमआरडीए किंवा एमआयडीसीपैकी कोणत्याही यंत्रणेकडून औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या व्यावसायिक, नागरिकांसमोर परिसराची चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, एमआयडीसीकडे सध्या सुमारे ३६ एकर जागा उपलब्ध आहे. त्यापैकी नऊ एकर जागेवर पीएमआरडीएकडून घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली असून, प्रकल्पासाठी जागा देण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुंबईतील संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत असला, तरी चाकण एमआयडीसीतील कचऱ्याचा प्रश्न लक्षात घेता प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेला गती देणे आवश्यक असल्याचे उद्योजकांचे मत आहे.
“औद्योगिक परिसरात कचरा टाकल्याबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहे. परदेशी उद्योजक आल्यानंतर त्यांच्यापुढे चुकीची प्रतिमा दिसायला नको, यासाठी यावर कायमस्वरूपी तत्काळ उपाययोजना करायला हव्यात. प्रकल्प उभारणीस वेळ लागणार असला, तरी तात्पुरता पर्यायही उभारावा.”
– धनंजय शेडबाळे, उद्योजक, चाकण.
“घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. एमआयडीसी त्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू असून, लवकरच प्रकल्प मार्गी लावला जाईल.”
– डाॅ. अभिजीत चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.






