Wai MIDC: वाई एमआयडीसी सुरक्षित की धोकादायक? सोमवारी रात्री घडलेल्या ‘त्या’ घटनेने उद्योजक आक्रमक
Wai MIDC:

– कुमार पवार
Wai MIDC – वाई औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन आणि उलाढाल होत असताना वसाहतीच्या मूलभूत आणि आपत्कालीन सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशमूर्ती कारखान्याला सोमवारी रात्री लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी वाईसह पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून अग्निशमन दलाला पाचरण करावे लागले.
यावरुन वाईच्या औद्योगिक वसाहत परिसरात तातडीच्या अग्निशमन व्यवस्थेची गरज अधोरखित झाली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजकांच्या संघटनेने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. मात्र, या घटनेने वाई एमआयडीसीच्या अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
या औद्योगिक परिसरात सक्षम अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे या दुर्घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. अशी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर बाहेरील शहरांमधून मदत मागवावी लागत असेल तर एमआयडीसीच्या आपत्कालीन नियोजनाचे हे अपयश असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा आणि प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम आहे का, हा प्रश्न आता विचारला जात आहे. रात्रीच्या वेळी अपुरा पथप्रकाश, सुरक्षित रस्त्यांचा प्रश्न, बस थांब्यांची कमतरता यांसारख्या समस्यांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे एमआयडीसीमधील काही भागांत बेशिस्तपणे उभारलेल्या दुकानांमुळे वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी अवैध दारु, नशायुक्त पदार्थ, गॅस अथवा पेट्रोलची विक्री होत असल्याच्या तक्रारींचीही चर्चा आहे. या बाबींची संबंधित प्रशासनाने वस्तुनिष्ठपणे तपासणी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.




