यूपीएससी प्रशिक्षणासाठी “सीईटी’

राज्यातील सहाही प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येणार

 

पुणे – भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील सहाही प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येणार आहे.

राज्यात भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर या ठिकाणी आहे. तेथे प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. या केंद्राच्या सीईटीच्या अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे.

उमेदवाराला लेखी परीक्षेत व मुलाखतमध्ये प्राप्त गुण व त्यांनी प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेल्या पर्यायाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून, उमेदवारांची निवड करण्यात यावी. त्यामध्ये प्रवेशासाठी आरक्षण लागू राहणार असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील नियुक्‍तीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी पॅनल तयार करण्यात येणार आहे.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्‍ती

प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम निश्‍चित करण्यापासून उमेदवारांची अंतिम निवड करण्यापर्यंतच्या सर्व कार्यवाहीसाठी म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करणे, मुलाखतीसाठी किमान पात्रता गुण निश्‍चित करणे, लेखी परीक्षेचे गुण निश्‍चित करणे, मुलाखत परीक्षेचे गुण निश्‍चित करणे, परीक्षा केंद्र निश्‍चित करणे, प्रवेशाच्या जागा विचारात घेऊन मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या निश्‍चित करणे, मुलाखतीसाठी पॅनल तयार करण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्‍त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.