नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पाय आणखी एकदा खोलात गेला आहे. ऑलिम्पियन कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपूर्वी देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीवरुन ब्रिजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. आक्रमक कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदही घेतली आहे. जोपर्यंत पैलवानांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे.
सात कुस्तीपटूंनी मुलींनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून, याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या. समितीच्या चौकशीत काय निष्पन्न झाले, याबाबत कोणतेही तथ्य मांडण्यात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे म्हणणे ऐकावं, अशी आमची इच्छा असल्याचे साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितलं. आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असावे हीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणावे.
इतके गंभीर आरोप असतानाही ब्रिजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असल्याचे कुस्तीपटूंनी सांगितले. दरम्यान, WFI अध्यक्ष म्हणून 12 वर्षे पूर्ण केलेल्या सिंग यांनी 7 मे रोजी होणारी WFI ची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय निरीक्षण समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर केला होता. परंतु सरकारने अद्याप तो सार्वजनिक केलेला नाही. सरकारी पॅनलचा अहवाल सरकारने अद्याप सार्वजनिक केला नसल्याबद्दल कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली दरम्यान, कुस्तीपटूंच्या या आक्रमक पावित्र्यावर आणखी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.