मुंबईतला जन्म, अमेरिकेत शिक्षण, मराठी बोलण्यावरून ट्रोल; भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले कोण?

Shraddha Bhosale : कोकणातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होती आहे. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय येथील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले चर्चेत आल्या आहेत.
त्यांनी नुकतेच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांवतवाडीला जगाच्या नकाशावर दाखवण्यासाठी, विकास करण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचे म्हटले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत त्या मराठी बोलताना अडखळत बोलत असल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. त्यामुळे भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या श्रद्धा सावंत भोसले नेमक्या कोण आहेत हे पाहूयात…
भाजप उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांना सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे व माजी आमदार कै. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. श्रद्धा भोसले यांचे पती लखम सावंत भोसले हे भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत. श्रद्धा भोसले यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांनी अमेरिकमध्ये उच्चशिक्षण घेतले. त्या मूळच्या गुजरात येथील असून त्यांचे शिक्षण अमेरिका, लंडन येथे झाले आहे. २०१९ मध्ये त्यांचा विवाह राजघराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला.
दरम्यान, सावंतवाडी नगर परिषदेत निवडणुकीत भाजप सेना स्वबळावर लढत असून, शिवसेनेकडून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे स्वतः उमेदवारांसाठी मैदानात उतरले आहेत. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जापैकी ६ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उबाठा गटाच्या सीमा मठकर, भाजपकडून श्रद्धा सावंत भोसले, अन्नपूर्णा कोरगावकर अपक्ष, निशाद बुराण अपक्ष, शिवसेनेकडून अॅड. निता कविटकर आणि काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.





