सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांचा आज बुधवार (दि. 29 ऑक्टोबर) भाजपामध्ये अधिकृत पक्ष प्रवेश झाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार पाटील यांच्या सोबत लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे यांनी प्रवेश केला. दरम्यान, या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही हरकत घेतल्याची चर्चा होती. परंतु, मित्रपक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपने हा प्रवेश निश्चित केला. फलटण येथील बैठकीत फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, रणजितसिंह शिंदे आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात चर्चा झाली होती. यात २९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आज पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकात भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास माजी आमदार पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला.