लंडन – “लॉकडाऊन पार्टी’बाबत केलेल्या विधानावरून जोरदार टीका व्हायला लागल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी संसदेमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे. करोनाची साथ सुरू असताना 2020 च्या मे महिन्यात 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित पार्टीसाठी स्वतःच मद्य सोबत घेऊन यावे, अशा अर्थाचे विधान जॉन्सन यांनी केले होते.
त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका व्हायला लागली होती. विरोधी मजूर पक्षाच्या बरोबरच जॉन्सन यांच्या हुजूर पक्षातील सदस्यांकडूनही या वक्तव्यावर टीका व्हायला लागली होती. लॉकडाऊनच्या काळातील या पार्टीचे निमंत्रण देणारी जॉन्सन यांची ईमेल अलिकडेच माध्यमांनी प्रसिद्ध केल्यापासून या टीकेला सुरुवात झाली होती.
आपण अशाप्रकारे पार्टी आयोजित केली होती, हे जॉन्सन यांनी कबूल केले. कामाचा भाग म्हणूनच ही पार्टी आयोजित केली गेली होती. मात्र गेल्या 18 महिन्यात देशभरातील लाखो लोकांचा जीव गेला आहे. सरकारच नियम करत असताना त्या नियमांचा भंग सरकारच्या प्रमुखाकडूनच केला गेला. त्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे जॉन्सन म्हणाले.
या पार्टीचा पूर्ण तपशील जॉन्सन यांनी हाऊस ऑफ कॉमन्ससमोर सादर केला. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण ही एक अनौपचारिक पार्टी आयोजित केली होती. मात्र त्यांच्यासाठी एका वेगळ्या प्रकारे धन्यवाद देता येऊ शकला असता, असेही जॉन्सन यांनी मान्य केले.