सुरत – गुजरातमधील सुरतमधील एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या २४ जणावंर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सुरतचे जिल्हाधिकारी आयुष ओक यांनी दिली.
दिव्येश पटेल, संतोष विश्वकर्मा, सनत कुमार मिश्रा, धर्मेंद्र कुमार, गणेश प्रसाद, सुनील कुमार आणि अभिषेक सिंग अशी मृतांची नावे आहेत. सुरत शहरातील सचिन औद्योगिक परिसरातील एथर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बुधवारी अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर युनिटला भीषण आग लागली. या आगीनंतर बेपत्ता झालेल्या सात कामगारांचे मृतदेह गुरुवारी सापडले.
दरम्यान, बुधवारी पहाटे 2 वाजता केमिकल प्लांटमध्ये ज्वलनशील रसायनांच्या गळतीनंतर मोठ्या टाकीत स्फोट झाल्यानंतर आग लागली, असे सूरतचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 15 अग्निशमन बंब नऊ तास अथक प्रयत्न करत होते.