पिंपरी – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली असून बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला आहे. पालिका निवडणुकासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची शनिवार (दि. 21) आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, कायदा आघाडीचे प्रदेश सहसंयोजक सचिन पटवर्धन, राजेश पिल्ले, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, विजय फुगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, महिला आघाडी शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. भाजपा शहर कार्यकारिणीने बूथ यंत्रणा मजबूत करावी. केंद्र सरकार आणि राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने केलेल्या कामांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या विचारांना घराघरांत पोहोचवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. संघटनात्मक बांधणीबाबत 5 जून रोजी बैठक होणार आहे.