चंडिगढ – आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान 16 मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तो शपथविधी सोहळा शहीद भगतसिंग यांच्या गावी होईल. त्याआधी 13 मार्चला अमृतसरमध्ये आपचा रोड शो होईल. पंजाबमधील जनतेचे आभार मानण्यासाठी त्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल रोड शो आणि शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवून आपने पंजाबची सत्ता मिळवली. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्यातील तब्बल 92 जागा जिंकून आपने तीन-चतुर्थांश बहुमत मिळवले. त्यामुळे कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाची पंजाबमधील अनेक वर्षांची सद्दी संपली.