फलटण – सोमंथळी (ता. फलटण) येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने इर्टिका कार बुडाल्याने पिता- पुत्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आज स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. माण तालुक्यातील वारूगड येथील भारतीय सैन्यात कार्यरत छगन उत्तम मदने (वय 38) आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी प्रांजल मदने यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी, छगन मदने त्यांचे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी सोमंथळी येथे रात्री उशिरा येत होते. सोमंथळी- सस्तेवाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पुलावरून पाणी वाहत होते. या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने कर पाण्यात वाहून गेली. त्यात छगन मदने व त्याची मुलगी प्रांजल यांचा दुर्दैवी अंत झाला. छगन मदने लष्करात सेवा करीत होते. सुट्टीनिमित्त ते सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी आले होते. सकाळी ग्रामस्थ व जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यरात्री भरपावसात छत्री घेऊन घटनास्थळी मदत यंत्रणेला गती दिली.
छगन मदने व त्यांची मुलगी प्रांजल मदने यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. छगन विठ्ठल मदने जम्मू- काश्मीरमध्ये सैन्य दलात देशसेवा करत होते. दिवाळीसाठी ते चार दिवसांपूर्वी गावी सुट्टीवर आले होते. पोलीसांनी या दुरघटनेबाबत फारसे गांभीर्य दाखवले नाही. पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे आणि फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मोबाइल फोन उचलण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले नाही.या दुर्घटनेमुळे माण तालुक्यात शोककळा पसरली होती.