Bangladesh Ban IPL : बांगलादेश पेटला हट्टाला! एका मुस्तफिजुरसाठी संपूर्ण देशाला धरलं वेठीस; IPL प्रसारणावर घातली बंदी

Bangladesh IPL 2026 Broadcast Ban : बीसीसीआय आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांनी बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला संघातून मुक्त केल्यानंतर शेजारील देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. या कारवाईचा निषेध म्हणून बांगलादेश सरकारने देशात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
५ जानेवारी रोजी मंत्रालयाचे कडक आदेश –
बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ५ जानेवारी रोजी एक अधिकृत पत्र काढून देशातील सर्व टेलिव्हिजन चॅनल्सना आयपीएलचे कोणतेही सामने किंवा कार्यक्रम प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत. “बीसीसीआयने मुस्तफिझूर रहमानला बाहेर काढण्यामागे कोणतेही तार्किक कारण दिलेले नाही. या निर्णयामुळे बांगलादेशी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, हा निर्णय सार्वजनिक हितासाठी घेण्यात आला आहे,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
BANGLADESH GOVERNMENT HAS SUSPENDED IPL BROADCAST IN THE COUNTRY. [Devendra Pandey] pic.twitter.com/K1RsRQv8EP
— Johns. (@CricCrazyJohns) January 5, 2026
९.२० कोटींचा खेळाडू थेट बाहेर –
गेल्या महिन्यात अबूधाबी येथे झालेल्या आयपीएल लिलावात केकेआरने मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून विकत घेतले होते. मात्र, बांगलादेशत अल्पसंख्याकावर होत असलेल्या अन्यायामुळे भारतात त्याच्या समावेशावरून राजकीय वाद निर्माण झाला. ज्यामुळे बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिझूर रहमानला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये भारतविरोधी संताप अधिकच वाढला आहे.
टी-२० विश्वचषकावरही परिणाम; भारत दौऱ्याला नकार –
केवळ आयपीएलच नाही, तर आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी बांगलादेश संघ भारतात येण्यास नकार देण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपले सामने भारतात न खेळवता श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे (ICC) केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार त्यांचे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार होते, मात्र आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा – Joe Root Century : जो रुटचा सिडनीत शतकी धमाका! पॉन्टिंगचा मोडला विक्रम; आता सचिनचाही ‘हा’ रेकॉर्ड धोक्यात?
राजकीय तणावाचे सावट –
ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारचे पतन झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारमधील सल्लागारांनीही “आम्ही क्रिकेट किंवा देशाचा कोणताही अपमान सहन करणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.





