Ayush Mhatre : आयुष म्हात्रेचा इंग्लंडमध्ये मोठा धमाका! वैभव सूर्यवंशीला मागे टाकत केला विश्वविक्रम

Ayush Mhatre Breaks Under-19 Test Record : भारतीय अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या युथ टेस्ट सामन्यात भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने मोठा विक्रम केला आहे. आयुषने आपला सहकारी फलंदाज वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
आयुष म्हात्रेने केला विश्वविक्रम –
आयुषने दुसऱ्या आणि अंतिम युथ टेस्टच्या दुसऱ्या डावात १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने शतक झळकावले आणि वैभवचा विक्रम मागे टाकला. १८ वर्षीय आयुषने अवघ्या ८० चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १२६ धावा केल्या. त्याने ६४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि ६८व्या चेंडूवर षटकार मारत वैभवचा विक्रम मोडला.
आयुषने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युथ टेस्ट पदार्पणात दुसऱ्या डावात ६२ चेंडूंमध्ये १०४ धावा करत आपली छाप पाडली होती. डावखुरा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने १६७.७४ स्ट्राइक रेटने धावा करत विश्वविक्रम नोंदवला होता, ज्यात १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. आता अंडर-१९ युथ टेस्टमध्ये १५० किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आयुष म्हात्रेच्या नावावर आहे.
हेही वाचा – IND vs ENG : मँचेस्टर कसोटीतून वगळल्याने करुण नायर भावुक; केएल राहुलने दिला धीर, PHOTO व्हायरल
दुसरी टेस्ट झाली ड्रॉ –
इंग्लंडने आपला पहिला डाव ३२४ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात भारताने विहान मल्होत्रा (१२०) आणि आयुष (८०) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २७९ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतासमोर ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, भारताने शेवटच्या दिवशी ६ बाद २९० धावा करत सामना ड्रॉ केला. आयुष वगळता दुसऱ्या डावात इतर फलंदाजांचे विशेष योगदान मिळाले नाही. आयुषने या टेस्ट सीरिजमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने ४ डावांत ३४० धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विहान मल्होत्रानेही २७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत आदित्य रावत आणि आर. अंबरीश यांनी प्रत्येकी ६ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Yash Dayal : यश दयाल पुन्हा अडचणीत; क्रिकेटच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत FIR दाखल
इंग्लंडमध्ये वैभव आणि आयुषची कमाल –
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली, तर आयुषने टेस्ट सीरिजमध्ये आपली छाप सोडली. टेस्ट सीरिज ड्रॉ झाली असली तरी आयुषच्या विक्रमी खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. या सीरिजमधून भारतीय संघाच्या भविष्यासाठी अनेक सकारात्मक संकेत मिळाले आहेत. हा संघ जवळपास अंडर-१९ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या अंडर-१९ विश्वचषकात भारताचा दबदबा पाहायला मिळेल, अशी आशा आहे.





