Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

Vaibhav Suryavanshi Create History : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसरीकडे, भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंडमध्ये खेळत आहे. भारताच्या १९ वर्षांखालील आणि इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, ज्यामध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी अप्रतिम कामगिरी केली आहे. मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत इतिहास रचला.
वैभवने १९ वर्षांखालील गटात केला मोठा पराक्रम –
वैभव सूर्यवंशीने मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या ३१ चेंडूंमध्ये ८६ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीदरम्यान वैभवने ९ षटकार आणि ६ चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट २७७ इतका होता. या कामगिरीसह वैभव अंडर-१९ एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
वैभवने मोडला राजा बावाचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम –
Vaibhav Suryavanshi smashes back to back sixes! 🥶🔥 pic.twitter.com/lyIURNP84q
— Sports Culture (@SportsCulture24) July 2, 2025
याशिवाय, वैभव सूर्यवंशी हा अंडर-१९ वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. वैभव सूर्यवंशीपूर्वी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम राजा बावा याच्या नावावर होता. त्याने २०२२ मध्ये युगांडाविरुद्ध एका डावात ८ षटकार मारले होते.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये जलवा! सलग दोन कसोटीत शतकं ठोकत रचला इतिहास
इंग्लंड दौऱ्यावर वैभवचे शानदार प्रदर्शन –
१४ वर्षीय वैभवसाठी इंग्लंड दौरा आतापर्यंत अप्रतिम राहिला आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूने १९ चेंडूंमध्ये ४८ धावांची खणखणीत खेळी केली होती, ज्यामुळे भारतीय संघाने पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात वैभवच्या बॅटमधून ४५ धावा निघाल्या, परंतु या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिसऱ्या सामन्यात वैभवने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत ८६ धावांची तुफानी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. आता भारताने मालिकेत २-१अशी आघाडी घेतली आहे.





