IND vs ENG : मँचेस्टर कसोटीतून वगळल्याने करुण नायर भावुक; केएल राहुलने दिला धीर, PHOTO व्हायरल

IND vs ENG Karun Nair Emotional Photo Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात सलग ६ डावांमध्ये अपयशी ठरलेल्या करुण नायरला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करुण नायर रडताना दिसत आहे, तर केएल राहुल त्याला समजावताना दिसत आहे. करुणचा हा फोटो पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.
करुण नायर प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने भावुक –
सुमारे ८ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरकडून इंग्लंड दौऱ्यावर चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळूनही त्याला फलंदाजीमध्ये विशेष काही करता आले नाही. करुणने अनेक डावांमध्ये चांगली सुरुवात केली, पण ती मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकला नाही. ६ डावांमध्ये त्याच्या फलंदीतून केवळ १३१ धावा निघाल्या आणि ४० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. प्रत्येक वेळी तो चांगल्या लयीत दिसला आणि त्याच्या फलंदीतून काही चांगले फटकेही पाहायला मिळाले. परंतु, प्रत्येक वेळी तो आपली विकेट गमावून परतला. यामुळेच चौथ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले.
करुण नायरच्या व्हायरल फोटोमुळे चाहते भावुक –
I feel very bad to see Karun Nair crying like this. I wish the team management would give him another chance to prove himself. 💔🥺 pic.twitter.com/NF5jfMotSZ
— KLR (@KLRNation1) July 24, 2025
सोशल मीडियावर सध्या करुण नायरचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रडताना दिसत आहेत. यावेळी त्याचा मित्र केएल राहुल त्याला समजावताना दिसतोय. करुणची ही अवस्था पाहून चाहतेही खूप भावुक झाले आहेत. काही चाहत्यांच्या मते, करुण कदाचित निवृत्तीचा विचार करत असावेत. त्याबरोबर काही चाहत्यांच्या मते, टीम मॅनेंजमेंटने त्याला आणखी एक संधी द्यायला हवी.
हेही वाचा – Yash Dayal : यश दयाल पुन्हा अडचणीत; क्रिकेटच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत FIR दाखल
८ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन –
करुण नायरने २०१७ मध्ये त्रिशतक झळकावले होते, पण त्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर पडला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीच्या जोरावर करुणने ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. मात्र, पहिल्या डावात तो खाते न उघडता बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्यांनी २० धावा केल्या. एजबॅस्टन येथे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, पण तिथेही तो विशेष काही करू शकला नाही. लॉर्ड्सच्या सामन्यात करुणने पहिल्या डावात ४० धावा केल्या, पण दुसऱ्या डावात तो फक्त १४ धावाच करू शकला.





