Krishna Andekar : आयुष कोमकर प्रकरण: आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण

पुणे : आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी व आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर अखेर पुणे पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणात आधीच बंडू आंदेकरसह ८ आरोपींना अटक झाली असून, न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपींनी पोलिसांवर धमक्या देत त्रास दिल्याचे आरोपही झाले होते.
नेमकं प्रकरण काय?
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी, ५ सप्टेंबर रोजी, नाना पेठेत आयुष कोमकरवर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. आयुष क्लासवरून परत येऊन इमारतीच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल लावत असताना दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेतच आयुषचा जागीच मृत्यू झाला.
मागील वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच हे हत्याकांड रचण्यात आले. मृत आयुष हा वनराज आंदेकरचा भाचा होता. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी बंडू आंदेकरसह ८ जणांना अटक केली होती. मात्र, कृष्णा आंदेकर फरार होता. अखेर तो पोलिसांना शरण आला. दरम्यान, काल अटक केलेल्या आठ आरोपींची आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे





