Heavy rainfall Pune | पावसाचा जोर आणि प्रशासनाची मंद गती ; पुणेकरांना सोमवारची सकाळ मनस्तापाची

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावली. शहराच्या पूर्व तसेच उत्तर भागातील उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सर्वाधिक ९८ मिमी पावसाची नोंद कळस- विश्रांतवाडी परिसरात झाली आहे. हडपसर परिसरात ९५ मिमी आणि नगररस्ता परिसरात तब्बल ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शहराच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेडून १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात पर्जन्यमापक यंत्रणा बसवली असून त्याद्वारे शहरातील पूरस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.१४ ठिकाणी साचले पाणीरविवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे शहरात १४ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थाप विभागास प्राप्त झाल्या. त्यात बावधन, हडपसर-मांजरी, विठ्ठलनगर हडपसर, प्रभात रस्ता, माणिकबाग-सिंहगड रस्ता, वाघोली, विमानतळ रस्ता, माऊलीनगर कात्रज, अप्पर इंदिरानगर,
खांदवेनगर, केशवनगर, खिसे पार्क, टिंगरेनगर, आंबेडकरनगर मार्केटयार्ड, सुभाषनगर विश्रांतवाडी, सय्यदनगर हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता आणि दत्तनगर मांजरी खुर्द या भागांत पाणी साचले होते. पालिकेच्या पथकांनी तत्परतेने पाण्याचा निचरा केला तर कुठेही घरात पाणी शिरले नाही. मात्र, पाणी काढण्याचे काम सकाळी ९ नंतर सुरू झाल्याने सोमवारी सकाळी बाहेर पडलेल्या पुणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला .





