पुणे -यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेआतापासूनच पाणी बचतीच्या सूचना शासनाने महापालिकेस केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने नियोजन सुरू केले असले, तरी शहरातील तब्बल 97 टक्के स्वच्छतागृहांसाठी पिण्याचे पाण्याचे नळजोड आहेत. यामध्ये सुलभ शौचालय तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांचा (युरिनल) समावेश आहे.
महापालिकेने वेळीच पावले उचलून स्वच्छतागृहांना पिण्याचे पाणी वापरण्या ऐवजी बोअरवेल अथवा इतर पाणी वापरल्यास मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. शहरात सुमारे 1,160 स्वच्छतागृहे असून यात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नुकतीच संकलित करण्यात आली होती. यातून ही बाब समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या स्वच्छतागृहांसाठी वर्षभरात दीड ते दोन टीएमसी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचा अंदाज आहे. स्वच्छतागृहात पिण्याचे पाणी वापरण्यात येते. पण, येथील एकूण स्वच्छतेसाठी शुद्धीकरण केंद्रातील सांडपाणी वापरले जाते आहे. त्यामुळे काही अंशी का होईना, पाण्याची बचत होत आहे. महापालिकेने नेमलेली खासगी संस्था जेटिंग मशिनद्वारे ती स्वच्छतागृहांची साफसफाई करते. तर, स्वच्छतेसाठी शुद्धीकरण केलेले सांडपाणी घेणे ठेकेदारास बंधनकारक आहे.
बोअरवेलचा प्रयोग ठरला होता यशस्वी
शहरात 2015 मध्ये पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. या कालावधीत जवळपास वर्षभर पाणीकपात करण्यात आली. याच वर्षात स्वच्छतागृहात होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर कमी करण्यासाठी पालिकेने अनेक स्वच्छतागृह परिसरात बोअरवेल घेतल्या होत्या. तसेच जवळची स्वच्छतागृहे या बोअरवेलशी जोडून नियोजन केले होते. मात्र, आता 28 ठिकाणीच बोअरवेल वापरले जात आहेत. अनेक भागांत ते बंद असून जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने पिण्याचे पाणी वापरले जात आहे.
गळतीकडे दुर्लक्ष
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी केवळ 28 ठिकाणी बोअरवेलचे पाणी वापरले जाते. ही स्वच्छतागृहे गरजेनुसार महापालिकेने वेळोवेळी उभारली आहेत. मात्र, ती उभारताना त्यांना वापराचे पाणी उपलब्ध करणे आवश्यक असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. अनेक स्वच्छतागृहांच्या पाण्याच्या टाक्या सकाळीच भरल्या जातात. मात्र, स्वच्छतागृहांतील नळ गळतीमुळे हे पाणी वाया जाते.या टाक्या भरल्या का, नळजोड गळके आहेत का, यावर तेथील कामगार लक्ष ठेवतो.