पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा नुकताच आपल्याकडे साजरा झाला. हा सोहळा यंदा नेदरलॅंड या युरोपीय देशातही मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. तेथे स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी आपल्या लाडक्या आणि पराक्रमी राजाला मानाचा मुजरा अर्पण केला.
नेदरलँडमध्ये नोकरी-शिक्षणासाठी गेलेल्या मराठी बांधवांनी तेथे “अल्मेरे महाराष्ट्र मंडळ’ स्थापन केले आहे. हे मंडळ तेथे महाराष्ट्रातील विविध परंपरा, सांस्कृतिक सण-उत्सव साजरे करून आपली माती आणि नाती जपण्याचे कार्य करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष होते.
याचे औचित्य साधून पारंपरिक पोशाखात निघालेल्या शिस्तबद्ध मिरवणुकीच्या माध्यमाने अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला.
यावेळी अहमदनगर येथील मयुर सब्बन यांनी शिवरायांची भूमिका साकारली. तर, मावळ्यांच्या पोषाखात सहभागी मराठीजन आणि युवतींनी नृत्याद्वारे, तर लहान मुलांनी लाठीकाठी प्रदर्शनामार्फत महाराजांना मुजरा केला.
तुतारीच्या नादगर्जनेने सुरू झालेल्या या देदीप्यमान सोहळ्यामध्ये शिवजन्म, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, आग्र्यावरून सुटका, गड आला पण सिंह गेला आणि राज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला.
अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना बिपीन पाटील (मुंबई), दीपाली पाटील (बुलढाणा), उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे), हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी केली.