पिंपरी, दि. 25 – मोरवाडी येथील आयटीआय इमारतीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 3 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. शिवम एंटरप्रायझेज या ठेकेदाराने इतरांपेक्षा दर कमी सादर केल्याने त्यांची निविदा स्वीकृत करण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार संबंधीत ठेकेदारांसोबत करारनामा करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिकेने 1992 मध्ये मोरवाडी आयटीआयची स्थापना केली. सुरूवातीच्या काळात आयटीआय सुरू झाले तेव्हा 3 ते 4 ट्रेड शिकविण्यात येत होते. त्यावेळी आस्थापना खर्च, कच्चा माल, साहित्य खर्च कमी होता. मोरवाडी आयटीआयमध्ये सध्या एकूण 14 ट्रेड शिकविले जात आहेत. 14 ट्रेडच्या 36 तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयटीआयमधील वीजतंत्री (इलेक्ट्रॉनिक्स) या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. याचबरोबर मोरवाडी आयटीआय इमारतीचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या कामासाठी नुकतेच ठेकेदारांकडून निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत. निविदा दर 1 कोटी 61 लाख 47 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, 12 ठेकेदारांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यापैकी शिवम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेससह निविदा दरापेक्षा 35.99 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 3 लाख 58 हजार रुपये दर सादर केला आहे.