पुणे – आर्थिकदृृष्ट्या महिला सबलीकरण, सक्षमीकरणाच्या दृष्टीने वंचित विकास आयोजित व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रायोजित “आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या उपक्रमाचे येत्या 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी (दि.1) सकाळी 11 वाजता म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे असणार आहेत. बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांना “उद्योगरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर व खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रतिनिधी योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या आवाहनानुसार “व्होकल फॉर लोकल’ उपक्रमांतर्गत महिलांनी तयार केलेल्या घरगुती उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे मीना कुर्लेकर यांनी स्पष्ट केले आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू, बचत गटाची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, सिल्क साड्या, हॅंडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, हर्बल उत्पादने, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, दिवाळी फराळ आदींचे स्टॉलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमांची रेलचेल
या प्रदर्शन व कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे. खादी व हातमागावरील कपडे परिधान करून फॅशन शो, शाहीर हेमंतराजे मावळे व सहकाऱ्यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, स्वर संध्या आयोजित हिंदी व मराठी गाण्यांची मैफल, महिलांचा अभया सन्मान, भरड धान्य पाककृती व सखोल माहिती अभियान, सामर्थ्य महिला मंचातर्फे पारंपरिक खेळ, असे विविध कार्यक्रम होणार आहेत, असे तेजस्विनी थिटे यांनी सांगितले.