पुणे – युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार असलेल्या ईजी.5.1 अर्थात “एरिस’चे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात रुग्णसंख्या वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील जीनोम सिक्वेन्सिंग यंत्रणेमध्ये मे महिन्यात हा उपप्रकार आढळून आला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा विषाणू आढळून आलेला नाही.
राज्यात आतापर्यंत 1.16 या उपप्रकाराचे एक हजार 733 रुग्णांचे निदान झाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत (43), त्यानंतर पुणे (34) आणि ठाणे (25) येथे आहेत. राज्यात सध्या एक्सबीबी.1.16 आणि एक्सबीबी.2.3 हे उपप्रकार आढळून येत आहेत.
“महाराष्ट्रात मे महिन्यात ईजी.5.1 उपप्रकार आढळून आला होता. त्यानंतर त्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. ईजी.5.1 हा ओमायक्रॉन विषाणूच्या एक्सबीबी.1.9चा उपप्रकार आहे. त्याचा प्रसाराचा वेग जास्त असता तर आतापर्यंत संसर्ग वेगाने पसरला असता. मात्र, सध्या तरी तशी परिस्थिती नाही. तरीही, विषाणूच्या उत्परिवर्तनावर बारकाईने अभ्यास करण्याचे काम सुरूच आहे.”- डॉ. राजेश कार्यकर्ते, “इन्साकॉग’चे समन्वयक, बीजे मेडिकल कॉलेजमधील मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख
“गेल्या 15 दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तीन रुग्ण अत्यवस्थ असून त्यापैकी दोन रुग्ण 75 वर्षांपुढील तर एक रुग्ण एचआयव्हीग्रस्त आहे. करोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा “एरिस’ हा उपप्रकार तीव्र प्रभाव टाकणारा सध्या तरी दिसत नाही. विषाणूमध्ये सातत्याने म्युटेशन होत असते. सहव्याधी असलेले रुग्ण, दुर्मीळ आजार असणारे रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना नवीन उपप्रकारांच्या संसर्गाचा जास्त धोका असतो.” – डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ