मुंबई – मुंबई विमानतळाने ऐतिहासिक कामगिरीसह आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरएका दिवसात विक्रमी 1,61,760 प्रवाशांना सेवा देण्यात आली आहे. हा विमानतळ सध्या फक्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून कार्यरत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही मुंबई विमानतळाच्या या रेकॉर्डबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “एक ऐतिहासिक कामगिरी! 11 नोव्हेंबर रोजी, आम्ही 24 तासांत 1,032 उड्डाणे करून विश्वविक्रम नोंदवून सर्वात व्यस्त हवाई वाहतूक दिवस साजरा केला. आणि आज, मुंबई विमानतळावर एक नवीन मैलाचा दगड रचण्याचा मान आम्हाला मिळाला आहे.
या सिंगल रनवे विमानतळाने एका दिवसात 1,61,760 प्रवाशांना विक्रमी सेवा दिली आहे! भारतीय विमानवाहतूक प्राधिकरण, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल, इमिग्रेशन आणि कस्टम्स, एअरलाइन भागीदार आणि या विमानतळावरील आमच्या अदानी टीमचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी खूप खूप आभार. जय हिंद .”
दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई विमानतळावरून एक हजाराहून अधिक उड्डाणांची एअर ट्रॅफिक मुव्हमेंटची नोंद झाली होती. 11 नोव्हेंबर रोजी 1032 फ्लाइटचे टेकऑफ आणि लॅंडिंग झाले. आता एका दिवसात 1,61,760 प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम झाला आहे. हे मुंबई विमानतळाची देखभाल करताना सुरक्षा आणि मानक प्रवासी सेवेचे प्रमाण वाढवण्याची क्षमता दर्शवते.