Sharad Pawar: मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. याकरीता त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. एकीकडे हा प्रश्न निर्माण झालेला असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांच्या ओबीसी दाखल्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आरोपांना उत्तर दिले. “कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. ज्यावेळेस शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजी मधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. हा सगळा बालिशपणा सुरू आहे. खोटी प्रमाणपत्र हे मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे,” असा टोलाही सुळे यांनी लगावला.
शरद पवारांनी आधीच कुणबी दाखला काढला असून या आधीपासून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारांच्या शाळेतील दाखल्यावर मराठा असा उल्लेख असताना काही जण जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला व्हायरल केला जातोय. जे जिजाऊचे वंशज असल्याचं सांगतात त्यांनी हे केलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या माध्यमातून ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केला आहे.