नवी दिल्ली-भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा आज 21 वा दिवस आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे यांनी “डब्लूएफआय’ला आदेश जारी करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, आर्थिक कामांवर बंदी घातली आहे.
आयओएने कुस्ती महासंघाला सर्व दस्तऐवज, खाती आणि परदेशी टूर्नामेंट, वेबसाइट ऑपरेशन्स प्रवेशासाठीचे लॉगिन त्वरित सुपूर्द करण्यास सांगितले आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका रद्द करून आयओएच्या तात्पुरत्या समितीकडे निवडणुकांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविल्यानंतर आयओएने हे पाऊल उचलले आहे.
आयओएने 45 दिवसांच्या आत निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यांची तात्पुरती समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये वुशू फेडरेशनचे भूपेंद्र सिंग बाजवा, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर आणि निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे. यापूर्वी, कुस्ती संघटनेचे सरचिटणीस व्ही. एन. प्रसूद हे महासंघाचे काम सुरू ठेवताना ईमेल व इतर साधनांचा वापर करत होते.
विनेश-बजरंगचा “टॉप्स’मध्ये समावेश
जंतरमंतरवर अंदोलन करत असलेले कुस्तीपटू बजरंग पुनिया व विनेश फोगट यांना आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये (टॉप्स) कायम ठेवण्यात आले आहे. मिशन ऑलिम्पिक सेलने मागील कामगिरीच्या आधारे 27 नवीन खेळाडूंना टॉप्सच्या कोर आणि डेव्हलपमेंट गटात सामील केले असून अनेक खेळाडूंना त्यातून वगळले आहे. बराच वेळ न खेळल्यामुळे बजरंग आणि विनेशला टॉप्समधून वगळले जाण्याची शक्यता होती; परंतु एमओसीने असे कोणतेही पाऊल उचलले नाही.